Thursday, August 14, 2014

सिंहावलोकन स्वातंत्र्याचे

               आज १५ ऑगस्ट २०१४ भारताला स्वातंत्र्य मिळाल या घटनेला आता ६७ वर्षे पूर्ण होताहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि अशावेळी आपण आपल्या स्वातंत्र्याच सिंहावलोकन केल पाहिजे.
                        'ट्रेन टू पाकिस्तान' हि खुशवंतसिंग यांनी फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी या कादंबरीतील एक परिच्छेद फार बोलका आहे. जेव्हा एक समाजवादी विचारांचा तरुण मनो माजारातील इंग्रजांची प्रशंसा करणाऱ्या समूहाला प्रश्न विचारतो कि तुम्हाला स्वातंत्र्य नको आहे का? त्यावेळी ते उत्तरतात."
स्वातंत्र्य हि चांगली गोष्ट असली पाहिजे पण आम्हाला स्वातंत्र्यापासून काय मिळणार? बाबुसाहीब तुमच्या सारख्या सुशिक्षित माणसाना इंग्रजांच्या जागी नोकऱ्या  मिळतील, आम्हाला काय जास्त जमीन, जास्त म्हशी मिळणार आहेत का? 'नाही' आणखीन एक मुस्लिम म्हणाला, स्वातंत्र्यासाठी जे लढले त्या सुशिक्षित माणसांसाठी स्वातंत्र्य आहे, आपण इंग्रजांचे गुलाम होतो आता सुशिक्षित भारतीयांचे किंवा पाकिस्तान्यांचे गुलाम होऊ!"   
                 खरच रंजलेला-गांजलेला इथला कष्टकरी-शेतकरी वर्ग यांच्या परिस्थितीत स्वातंत्र्यानंतर फरक झाला? भारतातील गोर-गरीब जनतेला किमान जगण्याइतपत सोयी-सुविधा मिळाल्या का? तर नाही आजही हे लोक आपल्या समस्या उराशी घेऊन जगत आहेत. अजूनही खर स्वातंत्र्य त्यांच्या पर्यंत पोहोचलेच नाही स्वातंत्र्याची एक व्याख्या विकासासाठी आवश्यक वातावरण अशीही केली जाते परंतु दुर्दैवाने आपण स्वातंत्र्याच्या ६७ वर्षाच्या कालखंडात असे वातावरण शकलो नाही.
                 इथ हिंदू-मुस्लिम दंगली होताहेत गरीबाची संख्या कमी व्हावी म्हणून अत्यंत नालायक पद्धतीने दारिद्र्य रेषाच खाली आणली जात आहे. दलित- अल्पसंख्यांक यांसारखे दुर्बल घटकांवर आजही फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होताहेत महिला अजूनही सुरक्षित नाहीत तर अजूनही राजकारणात घराणेशाही वाढलेली आहे. स्वातंत्र्यानंतर लगेच नेहरू घराण्याकडे गेलेली सत्ता अजूनही तिकडेच होती. स्थानिक पातळीवरील राजकारणातही हेच सार होऊन बसलेलं आहे. गरीब आणि श्रीमंत हि फार मोठी दरी इथ निर्माण झालेली आहे. देशातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या हातात देशाची अर्ध्याहून अधिक संपत्ती एकवटलेली आहे. तर याच वेळी कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर झोपानार्यांची संख्या प्रचंड आहे. शासन आणि नोकरशाहीत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. या सगळ्या समस्यांमध्ये ६७ वर्षात काहीही फरक पडलेला नाही. याला स्वातंत्र्य म्हणायचं?
                  महात्मा गांधी म्हणायचे कि, गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे स्वातंत्र्याचे उद्दिष्ट असल पाहिजे, पण अजूनही गांधीजींच हे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. समानतेच क्रांतीच स्वप्न पाहणाऱ्या भगतसिंगाच बलिदान अपूर्ण राहील आहे म्हणूनच कि काय नामदेवराव ढसाळांना 'कंच्या गाढवीच नाव स्वातंत्र्य?' म्हणाव लागलं.
                  म्हणूनच मला अस वाटत की या स्वातंत्र्याच्या विशिष्ट टप्प्यावर स्वातंत्र्य हे आपल्या पुढचं एक आव्हान झालेले आहे. त्याला पूर्णत्वाकडे नेणे हि तुमची माझी आपणा सर्वांची जबाबदारी आहे कारण खलिल जिब्रान म्हणतो," झाडाचं एक पान गळण्यासाठी सुद्धा त्याला झाडाची मूकसंमती असावी लागते." तसेच या समाजात आपल्या मूकसंमतीशिवाय काहीच वाईट किंवा चांगले होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या प्रश्नांना आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपणच जबाबदार आहे. अस मानून हि परिस्थिती पालटण्यासाठी आपण तयार झाले पाहिजे. स्वताच्या हक्कासाठी तसेच इतरांच्या हक्कासाठी लढल पाहिजे. तरच कुठेतरी २०२० साली तरी आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ नाहीतर हे अर्धस्वातंत्र्य आपणाला विनाशात नेईल! इन्कलाब जिंदाबाद……